भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (FALI) हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी ठरतोय प्रेरणादायी-विद्यार्थ्यांना शाळेत लागली शेतीची गोडी.
सडक अर्जुनी=
गोंदिया जिल्ह्यातील वसंत हायस्कूल डोंगरगाव सडक शाळेमध्ये मागील दोन वर्षांपासून “भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (FALI)” हा उपक्रम राबविला जातो. भारत हा खेड्यांचा देश असून शेतीप्रधान आहे. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून अर्थकारणाची दिशाही शेतीशी निगडित असते.देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जवळपास 75 टक्के विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेती असते. विद्यार्थ्यांना शेतीची गोडी निर्माण व्हावी व माध्यमिक शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी कृषिविषयक ज्ञान आत्मसात करून भविष्यात शेती आणि शेती व्यवसायाकडे सकारात्मक बघावे यासाठी फालीने शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाशी संबंधित पाठ्यक्रमाचा समावेश करून शेतीचे धडे गिरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमा अंतर्गत वसंत हायस्कूल मधील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी फाली कडून मिळालेल्या शेडनेट मध्ये कोबी, वांगी, फ्लॉवर, टॉमेटो, मिरची, पालक, मेथी, कोथिंबीर अशा भाज्यांची लागवड केली आहे.या उपक्रमातून मुलांना बीयांची ओळख, वाफे तयार करणे, पाणी देणे, तणनाशके, कीडनियंत्रण, पिकांची वाढ, खुरपणी, भाज्या काढणे, पिकांचा कालावधी तसेच पॅकेजिंग व मार्केटिंग इत्यादींचे ज्ञान कृतीतून दिले जाते.
शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये कृषी क्षेत्रात शिक्षणासोबत वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत शेडनेटची उभारणी करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी फळे, फुले व भाजीपाला यांचे उत्पादन यशस्वीरीत्या घेत आहेत.
शेडनेट उद्घाटन प्रसंगी शाळेचे प्राचार्य दिवटे सर, पर्यवेक्षक हेमने सर, कृषी विषयाचे प्राध्यापक श्री विजय जावळकर सर,बारसागडे सर,मते सर,गजभिये सर,काशीवार सर, लंजे सर,पवार सर,मानकर सर,नेवारे सर,श्रीमती मानकर मॅडम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी FALI कृषी विषय शिक्षक स्वप्निल रांधवन यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले.