आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप. डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न.

मनोरंजन महाराष्ट्र राजनीति

 

आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्य वाटप.

डव्वा येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरीष्ठ प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न.

सडक अर्जुनी : २३ जुन
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज आमदार तथा माजी मंत्री आ. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे तसेच इतर वर्गांतील विद्यार्थ्यांचेही मनपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान आमदार बडोले यांनी विद्यार्थ्यांशी तसेच शिक्षकांशी संवाद साधला. शालेय जीवनातील अनुभव कथन करत शिक्षणाचे आयुष्यातील महत्त्व, जिद्द, मेहनत आणि चिकाटी यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून आपले भवितव्य घडवावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी आमदार बडोले यांनी शाळेच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेत शाळेतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून समाधान व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आलेल्या मागण्या मान्य करून त्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले.

आपल्या मनोगतात आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे मजबूत पायाभूत दगड आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास विद्यार्थी वेगाने प्रगती करू शकतात. यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शाळेच्या विकासासाठी कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. तसेच, शाळेच्या भौतिक अडचणी, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षक बांधवांना दिल्या.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती चेतन वडगाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुमेश्वर पटले, अनिल बिलिया, गटशिक्षणाधिकारी एल. चव्हाण, प्रशांत शहारे, सरपंच योगेश्वरी चौधरी, केंद्रप्रमुख एन. सी. बीजेवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोमेश्वर कुरसुंगे, उपाध्यक्ष मेघनाथ उंदीरवाडे, विजय गावराने, सूर्यकांता चौधरी, शितल नंदेश्वर, डीलेश्वरी कुरसुंगे, मिलिंद येल्ले, मुख्याध्यापक देशपांडे सह सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *