सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र नसल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश परीक्षेपासून वंचित होण्याचे संकट – पालकांमध्ये तीव्र नाराजी, शैक्षणिक संधी गमावण्याची भीती

अपराध करियर शिक्षा

सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र नसल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश परीक्षेपासून वंचित होण्याचे संकट
– पालकांमध्ये तीव्र नाराजी, शैक्षणिक संधी गमावण्याची भीती

गोंदिया जिल्ह्यातील
जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 असून, देशभरातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेसाठी ही परीक्षा घेतली जाते. मात्र यंदा, ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मान्य असलेले सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्र ओबीसी विद्यार्थ्यांना पुरेसे न ठरता, केंद्र सरकारचा ‘सेंट्रल लिस्ट’ मधील ओबीसी प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जात आहे. ही अट अगदी अचानक लादण्यात आल्याने अनेक विद्यार्थी व पालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण ग्रामीण व आदिवासी भागात सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि जटिल आहे. अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून विलंब होत असून, अंतिम मुदतीपूर्वी प्रमाणपत्र मिळणे अशक्यप्राय वाटते.

एसटी आणि एस सी विद्यार्थ्यांना मात्र सवलत
विशेष म्हणजे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्रही ग्राह्य धरले जात आहे. हीच सवलत ओबीसी विद्यार्थ्यांना दिली जात नाही, ही बाब असमतोल निर्माण करणारी आहे, असे पालकांचे म्हणणे आहे.

ओबीसी पालकांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या मुलांना नवोदयसारख्या गुणवत्ताधारित शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र एका सर्टिफिकेटच्या अभावामुळे ही संधी हिरावून घेतली जात आहे. एवढ्या कमी वेळात सेंट्रल कास्ट मिळणे अशक्य आहे,” असे मत काही पालकांनी व्यक्त केले आहेत.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून नवोदय विद्यालय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसंबंधी लवचिकता दाखवावी, किमान अर्ज करताना प्राप्त प्रक्रिया सुरू असल्याचे दाखले ग्राह्य धरावेत, किंवा परीक्षा होईपर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *