अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न

अपराध महाराष्ट्र राजनीति

अडचणी दूर करून विकासाला गती देणार – आमदार राजकुमार बडोले

नगरपंचायत सडक अर्जुनी येथील आढावा बैठक संपन्न

सडक अर्जुनी | ०५ ऑगस्ट २०२५

नगरपंचायत सडक अर्जुनी येथे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपंचायतीच्या विविध विभागांतील कार्यप्रणाली, समस्या आणि योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली.

बैठकीत घरपट्ट्यांच्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांना मिळणाऱ्या घरकुल योजनांवरील परिणाम, झुडपी जंगल दाखवून प्रकरणांची नोंद न करण्याची अडचण, उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा अभाव, सार्वजनिक वाचनालयाच्या रखडलेल्या कामाची प्रगती, तसेच स्वच्छता मोहीम, बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन, कर संकलन आणि अन्य विकास प्रकल्पांबाबत तपशीलवार चर्चा झाली.

यावेळी आमदार बडोले यांनी स्पष्टपणे सांगितले की, घरकुल योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. अतिक्रमण प्रकरणांची योग्य चौकशी करून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा. विकासकामांमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी प्रशासनाने सजग राहावे. सडक अर्जुनी नगरपंचायतच्या सर्वांगीण विकासात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही.

ते पुढे म्हणाले, नागरिकांचे प्रश्न हेच माझे प्रश्न आहेत. जनतेचा विश्वास टिकवून ठेवल्याशिवाय विकासाला दिशा देता येत नाही.

या बैठकीस नगराध्यक्ष तेजरामजी मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, नगरसेवक आनंदरावजी अग्रवाल, देवचंदजी तरोणे, शशिकलाताई टेंभुर्णे, दीक्षाताई भगत, कामिनीताई कोवे, अश्लेषजी अंबादे, शाहिस्ताताई शेख, गोपीचंदजी खेडकर, रजनीताई परिहार, कमलादेवी अग्रवाल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *