सडक अर्जुनी वॉर्ड क्र. 16 मध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सडक अर्जुनी :
सडक अर्जुनी शहरातील वॉर्ड क्रमांक 16 परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकरांचा उच्छाद वाढला असून त्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. संध्याकाळी तसेच रात्रीच्या वेळी टोळक्याने वावरणाऱ्या या डुकरांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान होत आहे. काही ठिकाणी मका, भाजीपाला, तसेच धान्य पिकांवर डुकरांनी हल्ला चढवला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री बाहेर पडण्यास नागरिक घाबरू लागले
या भागात जंगली डुकरांची संख्या वाढत असून, ते घरांच्या परिसरात येऊन उच्छाद मांडत आहेत. त्यामुळे नागरिकांना संध्याकाळनंतर बाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना मोठा धोका जाणवतो आहे.
वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी
या संदर्भात नागरिकांनी वारंवार वनविभागाला तक्रारी केल्या असून देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये वनविभागाविषयी नाराजी पसरली आहे. “डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडू शकते,” अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गाने वनविभागाने तातडीने पथक नेमून जंगली डुकरांना पकडून जंगलात सोडावे किंवा अन्य पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.