ब्राम्हणी–मंदीटोला रस्ता खड्डेमय; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
सडक अर्जुनी (प्रतिनिधी):
सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी–मोगरा–मंदीटोला हा मुख्य रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य जनता प्रवास करते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने चालविणे कठीण जाते. त्यामुळे वारंवार किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.
नागरिकांनी वारंवार जिल्हा परिषदेसह स्थानिक जनप्रतिनिधींना या समस्येविषयी लेखी व तोंडी निवेदने दिली. तरीही अद्याप रस्ता दुरुस्तीची कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर लवकरच तीव्र आंदोलन उभारले जाईल.