स्मार्ट मीटरमुळे वाढलेले वीजबिल; कोसमतोंडी परिसरात ग्रामस्थांचा संताप
कोसमतोंडी (ता. ___) : कोसमतोंडी परिसरातील चिचटोला, मुंडिपार, धानोरी व मुरापार या गावांमध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अनियमित व प्रचंड वाढ झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पूर्वीप्रमाणेच वीज वापर असूनही स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल दुप्पट ते तिपटीने वाढले आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक व सामान्य कुटुंबांवर अनावश्यक आर्थिक भार पडला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात स्मार्ट मीटरविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गावकऱ्यांची मागणी आहे की, जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवावेत आणि आलेली अतिरिक्त बिले तातडीने कमी करून द्यावीत. अन्यथा संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा गोरगरिबांचे कैवारी शेतकरी नेते गौरेश बावनकर यांनी दिला आहे.