विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा स्पर्धेत उत्साह ठेवावा – आमदार राजकुमार बडोले
जागतिक क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न
सडक अर्जुनी : (२९ ऑगस्ट) सडक अर्जुनी येथील क्रीडा संकुलात जागतिक क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी विभागीय व जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना आमदार तथा माजी मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात घडविणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा विशेष सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेतही उत्साह ठेवावा. क्रीडा म्हणजे केवळ खेळ नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आणि आत्मविश्वास वाढविण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळाडू राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात संतुलन साधून आपली ओळख निर्माण करावी.
तसेच भारताचे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकत त्यांचे आदर्श जीवनचरित्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ. अविनाश काशीवार, कृ.ऊ.बा.स संचालक सर्वश्री प्रल्हाद कोरे, विलास बागडकर, खेमराज देशमुख, हरीश बन्सोड, तालुका क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी, नायब तहसिलदार जांभुळकर, गटशिक्षणाधिकारी चौव्हाण, प्रशांतजी बालसनवार, घनशाम डोंगरवार यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.