चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना धान विक्रीचे पैसे मिळाले नाहीत; आर्थिक संकट गडद

करियर महाराष्ट्र

चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना धान विक्रीचे पैसे मिळाले नाहीत; आर्थिक संकट गडद

सडक अर्जुनी = परिसरातील शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या हंगामात शासन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्री केली. मात्र विक्री करून तब्बल चार महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

धान विक्री केल्यानंतर शासनाकडून तातडीने पैसे मिळतील, असा विश्वास शेतकऱ्यांना देण्यात आला होता. पण प्रत्यक्षात चार महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना खत, बियाणे व शेतीकामांसाठी आवश्यक असलेला निधी उभारणे कठीण झाले आहे.

पेरणीच्या हंगामात भांडवलाचा तुटवडा
सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधोपचार यासाठी तातडीने भांडवलाची गरज आहे. मात्र धान विक्रीची रक्कम मिळाली नसल्याने अनेक शेतकरी सावकारांच्या दरवाज्यापर्यंत पोहोचले आहेत. कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शेतकऱ्यांत संतापाची लाट
“आम्ही धान विक्री करून चार महिने झाले. पैसे अजूनही मिळालेले नाहीत. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रकमेचे वितरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा स्थानिक शेतकरी संघटनांनी दिला आहे.

शासनाकडे मागणी
धान विक्रीचे पैसे वेळेत न मिळाल्यास शेतकरी वर्गाच्या उपजीविकेवर परिणाम होणार असून, कर्जाचे ओझे वाढणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने थकबाकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील शेतकरी व संघटनांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *