कनारपायली–उसिखेडा गाव नेटवर्कपासून वंचित : डिजिटल युगात गावकऱ्यांचा अंधारात प्रवास
प्रतिनिधी : मुन्नासिंह ठाकूर, सडक अर्जुनी
सडक अर्जुनी तालुक्यातील कनारपायली–उसिखेडा गाव मागील दहा वर्षांपासून मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. आज संपूर्ण देश “डिजिटल इंडिया”च्या दिशेने वाटचाल करत असताना या गावातील नागरिक मात्र अजूनही मोबाईल सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत.
दरवर्षी निवडणुकीत विविध जनप्रतिनिधींकडून “लवकरच नेटवर्क सुरू होईल” अशी आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र आजवर एकाही कंपनीचा टॉवर उभारण्यात आलेला नाही. यामुळे गावकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी, शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि ई-सेवा मिळवण्यात त्रास, तर महिला बचतगटांना बँक व्यवहार करण्यात अडचण—अशा अनेक समस्या गावकऱ्यांसमोर उभ्या आहेत.
गावातील तरुणांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले असूनही त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की –
> “एक दिवस जरी आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य किंवा सरपंच यांनी या गावात नेटवर्कशिवाय राहून पाहावं, म्हणजे आमची व्यथा त्यांना समजेल.”
गावातील नागरिक आता एकच मागणी करत आहेत – “आमच्या गावात लवकरात लवकर मोबाईल नेटवर्क सुरू करा, अन्यथा आंदोलन करू.”
—