ब्राह्मणी खडकी येथे पेट्रोल पंप चालकांच्या लापरवाहीमुळे गावकऱ्यांचा संताप – रस्ता बंद झाल्याने नागरिक त्रस्त
सडक अर्जुनी तालुका (प्रतिनिधी):
ब्राह्मणी खडकी गावाजवळील महामार्ग क्रमांक 53 वर उभारण्यात आलेल्या दोन पेट्रोल पंपांच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे नवीन टोल व जमदाडटोला गावात जाणारा सिमेंट रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एक पेट्रोल पंप नवीन टोलाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यालगत उभारला असून, या पंपात येणाऱ्या ट्रॅक रस्त्याचा मार्ग थेट गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या समोर नेण्यात आला आहे. तसेच, सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.
दुसरीकडे, भारत पेट्रोल पंप चालकांनी जमदाडटोला गावात जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावरही मुरूम टाकून मार्ग अडवला आहे. त्यामुळे गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच पेट्रोल भरण्यासाठी थांबणाऱ्या ट्रकांमुळे महिला, मुली आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांना शेतीमधील धान्य ट्रॅक्टरने नेणे अशक्य झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत ब्राह्मणी खडकी येथे या मनमानीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पेट्रोल पंप चालकांच्या दबावाखाली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील नितेश चूटे, गोपाल जमदाड, मुन्ना जमदाड, प्रल्हाद जमदाड तसेच नवीन टोल व जमदाडे येथील नागरिकांनी एकत्र येऊन चेतावणी दिली आहे की,
> “सात दिवसांच्या आत सिमेंट रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही, तर पेट्रोल पंपासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
—

