सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही
सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश
सडक अर्जुनी तालुक्यात खळबळ
सडक अर्जुनी (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3) अन्वये सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.
ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मंत्रालय मुंबई येथून मंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वाक्षरीने 3 नोव्हेंबर 2025 रोजी आदेश निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद गोंदिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागपूर विभाग आयुक्त कार्यालयाने दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित सरपंच व सदस्यांविरुद्ध प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर शासनाने सविस्तर तपासणी करून सदर प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
या आदेशानुसार सरपंच श्रीमती रिना हेमंत तरोणे, उपसरपंच श्री दिनेश सुनील मुनीश्वर तसेच सदस्य श्री. मार्तंड माणसाराम मेंढे आणि श्रीमती लोपा विजय गजभिये यांच्यावर ग्रामपंचायत कामकाजातील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद गोंदियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. माधुकर मनोहरराव वासनिक यांनी 6 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे पंचायत समिती सडक अर्जुनी यांना शासन आदेशाची प्रत पाठवून आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणामुळे सडक अर्जुनी तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून वडेगाव ग्रामपंचायतीतील प्रशासनिक हालचालींना वेग आला आहे.

