राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत!
शासनाकडून तातडीने मदतीची मागणी!
सडक अर्जुनी
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वडील हरी माधो इरले यांचे राहते घर जळून पूर्णतः स्वाहा झाले.
प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. आग इतकी भयानक होती की काही क्षणातच दोन्ही घरे पेट घेतली आणि पाहता पाहता संपूर्ण संसार जळून खाक झाला.
या आगीत घरातील धान्य, कपडे, शालेय पुस्तके, दागिने, रोख रक्कम आणि आवश्यक वस्तू सर्व काही भस्मसात झाले. विशेष म्हणजे रेखा ही अपंग असून स्वतंत्रपणे राहते, तर शेजारी तिचे वृद्ध वडील आपल्या पत्नीसह राहत होते. दोन्हींचे घर आगीत होरपळले असून आता त्यांना अंगणात राहून संसार करावा लागत आहे.
रेखा हिचा कमावता भाऊ काही वर्षांपूर्वीच मरण पावला असल्याने, या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा परिस्थितीत या आगीने त्यांच्या डोक्यावरचे छतही हिरावून घेतले आहे.
स्थानिक नागरिकांनी शासनाकडे त्वरित दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आपत्कालीन मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

