वडेगाव (हत्तीमारे टोला) येथे अज्ञातांकडून शेतकऱ्याचे धानाचे पुंजणे जाळले
लाखो रुपयांचे नुकसान; भरपाईची मागणी
सडक अर्जुनी = तालुक्यातील ग्राम वडेगाव (हत्तीमारे टोला) येथे अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याचे पाच अकराचे धानाचे पुंजणे जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्राम वडेगाव येथील शेतकरी हरिचंद इसतारी चूटे (रा. हत्तीमारे टोला, वडेगाव) यांच्या शेतातील धानाचे पुंजणे दि. 21/12/2025 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता जाळण्यात आले. ही घटना आकस्मिक आग असावी की गावातील जुना वाद कारणीभूत असावा, याबाबत गावात जोरदार चर्चा सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधितांनी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे.

