ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
ब्राह्मणी खडकी परिसरात वाघाचे पगमार्क आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतशिवार, नदीकाठ व जंगलालगतच्या भागात हे पगमार्क दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेची भावना आहे. विशेषतः सकाळी- संध्याकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी, गुराखी तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ गस्ती वाढवावी, रात्रीच्या वेळीही पेट्रोलिंग करून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच कोणतीही जीवित हानी होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना—सूचना फलक, ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन, तसेच आवश्यक ठिकाणी पिंजरे/कॅमेरे बसवावेत—याकडे वनविभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनविभागाकडून लवकरात लवकर योग्य कारवाई होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

