सडक अर्जुनी येथील सात्विक गायडन्स अकॅडमीचे ! ८ विद्यार्थी नवोदयमध्ये निवड — पार्श्वी कापगते जिल्ह्यात प्रथम
सडक अर्जुनी :
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सात्विक गायडन्स अकॅडमी, सडक अर्जुनी येथील तब्बल 8 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत नवोदय विद्यालयात आपली निवड निश्चित केली आहे.
या यशात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी कु. पार्श्वी कापगते हिने केली आहे. ग्रामीण भागातील कोहळीटोला/प्रधान टोला येथील पार्श्वीने गोंदिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत 100 पैकी 98.75 गुण मिळवले आहेत. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय कु. निधी हजारे, रुचित शहारे, कु. रोहिणी कुंभरे, विहान साखरे, रौनक बडोले, हार्दिक राजगिरे आणि भूपेन कोरे या विद्यार्थ्यांचीही नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालकांसह सात्विक गायडन्स अकॅडमीचे शिक्षक चांदेवार यांना दिले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला असून, अकॅडमीच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे हे द्योतक असल्याचे मत व्यक्त होत आहे. यंदाही सडक अर्जुनी तालुक्याने नवोदय प्रवेशात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत जिल्ह्यात अग्रक्रम मिळवला आहे, ही बाब विशेष ठरली आहे.

