तीन दिवसांपासून धगधगत आहे शशीकरण मंदिर परिसरातील डोंगर — वनविभागाची निष्क्रियता; वनसंपदा जळून खाक

अपराध महाराष्ट्र शिक्षा स्वास्थ्य

तीन दिवसांपासून धगधगत आहे शशीकरण मंदिर परिसरातील डोंगर — वनविभागाची निष्क्रियता; वनसंपदा जळून खाक

सडक अर्जुनी : शशीकरण मंदिर परिसरातील डोंगरावर गेल्या तीन दिवसांपासून भीषण आग लागलेली असून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत धगधगत असलेल्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक होत आहे.

विशेष म्हणजे, पहाडावर लागलेल्या आगीचे रात्रीचे छायाचित्रही समोर आले असून रात्रीच्या वेळीही पहाडी जळताना धगधग स्पष्टपणे दिसत आहे. अंधारात संपूर्ण डोंगर लालभडक दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, आग लागल्याची माहिती वारंवार वनविभागाला देण्यात आली असली तरी अद्यापपर्यंत आग विझवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी जंगलातील झाडे, झुडपे तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे आग आणखी पसरत असून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वनविभागाने तात्काळ पथक पाठवून आग नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

या घटनेमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून वनविभाग कधी जागा होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *