प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु

महाराष्ट्र राजनीति

प्रसूती दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यु

=अर्जुनी मोर तालुक्यातील कोरंबी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार=

(अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे यांचे स्थानांतर)

*मोरगाव अर्जुनी प्रतिनिधी:* अर्जुनी मोरगांव तालुक्यातील कोरभिटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला वसंता धनराज नैताम वय 33 वर्ष मुक्काम कोरंभिटोला हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे हे जबाबदार असून त्यांच्या निलंबनाची मागणी तसेच इतर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व वारसांना नुकसान भरपाई म्हणून पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सदर महिलेचे प्रेत आरोग्य केंद्रातून हलविणार नाही. अशी भूमिका मृतकाचे नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतल्याने दिवसभर आरोग्य केंद्राला जत्रेचे स्वरूप आले होते. जनतेचा आक्रोश पाहता गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डॉ. दिनेश बारसागडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव तालुका तिरोडा येथे सेवा संलग्न करण्यात आल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी संध्याकाळच्या सुमारास सदर महिलेवर अंत्यसंस्कार केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान सौ. वसंता धनराज नैताम वय 33 वर्ष रा. कोरंभिटोला या गर्भवती महिलेला प्रा.आ.केंद्र कोरंभिटोला येथे प्रसुती साठी दाखल करण्यात आले होते. सदर महिलेला उपचारासाठी सकाळी सहा ते दुपारी चार वाजता पर्यंत वैद्यकीय अधिकारी इतर कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही.असा आरोप करण्यात आला आहे. तीन वाजेच्या दरम्यान पती धनराज यांनी त्यांच्या पत्नीला होत असलेल्या प्रसववेदना बघून असह्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता परिचारिका सोनाली राऊत एक नर्स घेऊन येऊन ,बाळाने गर्भाशयामध्ये संडास केल्याचे तर्क लावून परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीडित गरोदर महिलेला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे हलविण्याचे सुचवण्यात आले. जवळपास पाच वाजता महिलेला अर्जुनी मोर. येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर अर्जुनी मोर ग्रामीण रुग्णालयातून सात वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा रुग्णालयासाठी रेफर केले. मात्र गोरेगाव जवळ जाऊन सदर महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतक महिलेचे नातेवाईक व सर्व कोरभिटोला ग्रामवासी जनतेने गर्भवती महिलेच्या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी जबाबदार असून त्यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. या आधी सुद्धा हे आरोग्य केंद्र कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. घटनेचे गांभीर्य बघता अर्जुनी मोर. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आरोग्य केंद्रात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. तर सकाळी आठ वाजता पासून पंचायत समिती सभापती सविता कोडापे ,जि. प. सदस्य जयश्री देशमुख, पं. स. सदस्य नाजूक कुंभरे, पं. स. सदस्य भाग्यश्री सयाम हे घटनास्थळावर ठाण मांडुन होते. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बारसागडे यांना इतरत्र हलवल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मृत्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती धनराज,तिन वर्षाची मुलगी डिंपल व म्हातारी सासू त्यांच्या मागे आहे.