दिवाणी न्यायालय सडक अर्जुनीत राष्ट्रीय लोक न्यायालयात 3105 प्रकरणांचा निपटारा.
सडक अर्जुनी.
उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी 14 डिसेंबर 2024 रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरिता चौथ्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात एकूण 3105 प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा निपटारा सामोपचाराने करण्यात आला . यात 44 लाख 27 हजार 94 रुपये वसुली करण्यात आले. उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांच्या संमतीने एक ज्येष्ठ महिला पक्षकारांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाला सहाय्यक सरकारी अभियोक्ता ओ. एस. गहाणे , वकील संघाचे अध्यक्ष ऍड.डी .एस. बन्सोड, ज्येष्ठ अधिवक्ता एस. बी. गिऱ्हेपुंजे, ऍड.व्ही.डी . रहांगडाले, ऍड. लंजे, ऍड.शंभरकर,ऍड.रामटेके ,ऍड.ए .एस. राऊत तसेच दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी येथील सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी, म.रा.वि.म.चे कर्मचारी ,ग्रामसेवक , पक्षकार, पी. एल .व्ही . मौजे व बैस उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे, जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव एन .के. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित लोक न्यायालयात एकूण 101 फौजदारी व दिवाणी प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आलीत . तसेच 3004 दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. ज्या पक्षकारांचे वाद सामोपचाराने मिटले त्यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी न्या. डॉ. विक्रम आव्हाड यांनी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जलद गतीने न्याय मिळण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालय हा अतिशय चांगला पर्याय उपलब्ध असून लोक न्यायालयात मिटलेल्या प्रकरणांमध्ये अपील होत नाही. तसेच कोर्ट फी देखील लागत नाही .त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेऊन जीवनाचा खरा अर्थ साधावा असे आवाहन केले.उल्लेखनीय म्हणजे सडक अर्जुनीचे लोकन्यायालय जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिले.सदर राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी सडक अर्जुनी न्यायालयाचे कर्मचारी वकील संघ पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक, बँक कर्मचारी, एम .एस .सी .बी. चे कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी व पी.एल.व्ही यांनी सहकार्य केले .
सडक अर्जुनी. जेष्ठ महिला पक्षकार लोकन्यायालयाचे उदघाटन करतांना. उपस्थित न्या. डॉ.विक्रम आव्हाड व इतर.