पत्रकाराला जेलमध्ये ‘फिट’ करण्याची योजना!
गुन्हा काय, तर जनतेचा आवाज उठवला, सत्य दाखविण्याचा प्रयत्न केला!
*मारवाडे यांनी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिली तक्रार
जनप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांकडून पत्रकारितेवर दबाव आणण्याचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप!
*गोंदिया :* स्थानिक पत्रकार तसेच महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर या वृत्तपत्राचे संपादक बबलू बाबूराव मारवाडे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विविध घडामोडींवर सातत्याने बातम्या प्रकाशित केल्यामुळे त्यांच्या विरोधात गंभीर कट रचला जात असल्याची भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी गोंदियाचे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना ईमेल आणि लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे.
मारवाडे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की काही स्थानिक राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या पत्रकारितेला आवर घालण्यासाठी आणि सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Act) अंतर्गत तसेच गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा डाव आखला गेला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, प्रतिशोध म्हणून त्यांच्यावर कधीही खोटे गुन्हे लावले जाऊ शकतात आणि त्यांचा जीव घेण्याचीही योजना रचली जात आहे. “मला ट्रकखाली चिरडून मारण्याचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मला मिळाली आहे,” अशी माहिती मारवाडे यांनी मीडिया शी बोलताना दिली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जनतेच्या समस्या, भ्रष्टाचार आणि स्थानिक नेत्यांच्या गैरव्यवहारांवर बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे संबंधित नेत्यांची नाराजी वाढली असून आता ते सूड भावनेने बदला घेण्याच्या तयारीत आहेत.
मारवाडे यांनी सांगितले की, यापूर्वीही २०१७-१८ साली त्यांच्या विरोधात दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते – एक SC/ST Act अंतर्गत तर दुसरा कलम ३५४ अंतर्गत. या दोन्ही प्रकरणांमध्येही संबंधित आमदाराच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रकार मारवाडे यांनी पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच कोणतीही अप्रिय घटना घडल्यास, जबाबदार म्हणून संबंधित आमदार, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे.
सद्यस्थितीत पोलिस प्रशासन किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तपासानंतरच या आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.
मारवाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “माझ्या विरोधात काही घडले तर त्यासाठी मी तिघांनाच जबाबदार धरेन, ज्यांची नावे पोलिसांकडे दिली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका कार्यकर्त्याने जाणूनबुजून माझ्याशी हेतू परस्पर भांडण करण्याचाही प्रयत्न केला होता. त्या घटनेबाबत मी पोलिसांत तक्रार केली नाही, पण आता जर असे प्रकार पुन्हा झाले तर सगळ्यांची नावे सार्वजनिक करेन आणि खरे चेहरे उघड करेन.”
शेवटी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मी अशा नेत्यांना घाबरत नाही, जे स्वतःच्या चुकीवरही जनतेला डोळे दाखवतात. सत्य सांगणाऱ्या पत्रकाराचा आवाज दबवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही.”
##