सडक अर्जुनीत २० हजार रुपयांची लाच घेताना गृहपालाला रंगेहात अटक

अपराध महाराष्ट्र शिक्षा

सडक अर्जुनीत २० हजार रुपयांची लाच घेताना गृहपालाला रंगेहात अटक

सडक अर्जुनी (प्रतिनिधी):
सडक अर्जुनी येथे आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी मुलांच्या वसतिगृहात भोजन पुरवठा केल्यानंतर ठेकेदाराकडून बिल काढून देण्यासाठी गृहपालाने ७ टक्के प्रमाणे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब गोंदिया येथील ACB कार्यालयात कळवली.

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ACBच्या गोंदिया पथकाने सापळा रचून आरोपी गृहपाल प्रमोद रामटेके (वय ५६ वर्षे) याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपी हा आदिवासी विकास विभागात कार्यरत असून सडक अर्जुनी येथील वसतिगृहात गृहपाल म्हणून काम पाहत होता.

कारवाईदरम्यान आरोपीकडून ₹21,670 रोख रक्कम, Redmi Narjo 60 5G मोबाईल (किंमत ₹4000) जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

ही कारवाई ACBचे उपअधीक्षक उमाकांत ढोले, निरीक्षक विलास सावळे, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत बोंडे, संजय बोहरे, अशोक हाडसुळे, नितीन शेंडे, राजेश मेश्राम, संदीप कांगणे, प्रशांत सोनटक्के, विनोद कांबळे, रोहित गोरे आदींच्या पथकाने केली.

या कारवाईमुळे सडक अर्जुनी तालुक्यात प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *