गोंदिया शहरातील मोहबे हॉस्पिटल परिसरात घाणीचं साम्राज्य!
रुग्ण व नातेवाईक त्रस्त; डॉ. विनोद मोहबे यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नाराजीचा सूर
गोंदिया │ शहरातील अंगूरबाग रोडलगत असलेल्या मोहबे मल्टीस्पेशॅलिटी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल परिसरात सध्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. हॉस्पिटलच्या शेजारील भागात साचलेला कचरा व दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विनोद मोहबे यांच्या हॉस्पिटलच्या शेजारील परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. या भागात साचलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूचं वातावरण अस्वच्छ झालं असून, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्याचा अतिरिक्त धोका निर्माण होत आहे.
दरम्यान, डॉ. मोहबे यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांशी उध्दट बोलण्याचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून स्वच्छता व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

