अर्ध्या वर्षातच उडाला डांबर! अग्रवाल ग्लोबलचे निकृष्ट काम उघड
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शशीकरण मंदिरासमोरील उड्डाणपुलावर रोज होतात अपघात — नागरिकांमध्ये संताप
सडक अर्जुनी (प्रतिनिधी):
राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील डांबर केवळ सहा महिन्यांतच उखडले असून, या पुलावर रोज लहानमोठे अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार अग्रवाल ग्लोबल कंपनी यांच्या मिलीभगतीचा गंभीर आरोप केला आहे.
पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच डांबर उखडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे आणि भ्रष्टाचारयुक्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कंपनीचे अधिकारी डी.पी.एम. किंवा पीएम. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता, कोणीही प्रतिसाद देण्यास तयार नव्हते.
आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास या पुलावरून जात असताना एमएच 35 आर 2369 या क्रमांकाच्या दुचाकीवरील चालक सौरभ धानगुण (वय अंदाजे 28, राहणार भागी, ता. चिचगड) हा युवक पुलावरील उखडलेल्या डांबरावरून घसरून गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत करत त्याला उपचारासाठी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
स्थानिक नागरिकांनी अग्रवाल ग्लोबल कंपनी तसेच महामार्ग प्राधिकरणावर तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

