नवोदय प्रवेश परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पालकांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य ठेवावेत आणि त्यांची कार्यरत स्थिती परीक्षेपूर्वी तपासावी.
गोंदिया, प्रतिनिधी :
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२६ या वर्षी कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पालकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देत महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. २०२५ मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेदरम्यान काही परीक्षा केंद्रांवर स्थानिक शिक्षकांकडून उघडपणे मदत दिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. त्यामुळे या वर्षीचा परीक्षेचा पारदर्शकतेने व निष्पक्षपणे पार पडावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील गरजू व बुद्धिमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची मोठी संधी उपलब्ध होते. मात्र गेल्या वर्षी झालेल्या चुकीच्या पद्धतीमुळे पात्र विद्यार्थ्यांचे अन्याय्य नुकसान होऊन पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पालकांनी यंदाच्या परीक्षेसाठी पुढील मागण्या केल्या आहेत:
२०२६ ची परीक्षा स्थानिक शिक्षक वा त्यांच्या परिचितांच्या देखरेखीखाली न घेता, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद किंवा इतर शासकीय विभागातील तटस्थ कर्मचाऱ्यांकडे देखरेख सोपविण्यात यावी.
सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य ठेवावेत आणि त्यांची कार्यरत स्थिती परीक्षेपूर्वी तपासावी.
परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात गर्दी, बाह्य व्यक्तींची उपस्थिती पूर्णपणे बंदी करावी.
गस्ती पथक / भरारी पथकांमध्ये कोणत्याही प्रकारे शिक्षक किंवा शिक्षण विभागातील कर्मचारी नियुक्त करू नयेत. त्याऐवजी महसूल, पंचायत राज, आरोग्य, पोलिस किंवा इतर तटस्थ विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष राखली जाईल.
पालकांनी सांगितले की, गेल्या वर्षी तक्रारी देऊनही ठोस कारवाई न झाल्याने या वेळी प्रशासनाने विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवोदय प्रवेश परीक्षा शंका येणार नाही अशा पूर्ण पारदर्शकतेने पार पडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

