सडक अर्जुनी नगरपंचायतचा संताजी जगनाडे महाराज जयंती विसर
तेली समाजाची प्रशासनाविरोधात नाराजी – चौकशी व शिस्तभंग कारवाईची मागणी
सडक अर्जुनी : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुष व संत महापुरुष यांच्या जयंती साजरी करणे बंधनकारक आहे. यानुसार ८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात साजरी करण्यात आली.
मात्र, सडक अर्जुनी नगरपंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संताजी महाराजांची जयंती साजरी करण्याकडे दुर्लक्ष झाले. केवळ पूर्वसूचना न देणेच नव्हे तर कार्यालयात कोणताही जयंती कार्यक्रम न होणे, हे शासन आदेशाचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराविरोधात सडक अर्जुनी शहरातील तेली समाज बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आज दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या नावे निवेदन देण्यात आले. तसेच सदर निवेदनाची प्रत नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी वाघमारे यांना देण्यात आली.
तेली समाजाच्या निवेदनात शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र.
GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) दिनांक २७/१२/२०२४
आणि जपुती-२२०८/१३३८/प्र.क्र.१०९/०८/२९.वि. दिनांक २४/११/२००८
यांचे स्पष्ट उल्लेख करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तेली समाज बांधवांच्या म्हणण्यानुसार—
“नगरपंचायतने शासन आदेशाचे पालन न करणे म्हणजे संत संताजी जगनाडे महाराजांचा अपमान आहे. जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी.”

