गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा
सडक अर्जुनी (प्रतिनिधी):कोसमतोंडी परिसरातील मुरपार लेडेझरी येथील ग्रामपंचायत कायलंय मधें
मूलभूत नागरी सुविधांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला आहे. गावातील विहिरींची दुरुस्ती न होणे, विहिरीतील गाळ वेळेवर न काढणे, तसेच शौचालयांची दुरवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, गावात विविध कामांच्या नावाखाली केवळ टोकन स्वरूपात कामे दाखवली जात आहेत. प्रत्यक्षात मात्र गावोपयोगी व नागरिकांच्या गरजांची पूर्तता करणारी कामे होत नाहीत. गावकडील ज्ञान, लोककला व गावोपयोगी उपकरणांचा योग्य वापर न करता निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
विशेषतः विहिरींची नीट दुरुस्ती करणे, गाळ काढणे, तसेच शौचालयांची तात्काळ दुरुस्ती करणे या मागण्या अनेक वेळा करूनही प्रशासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन केली आहे. जर तात्काळ योग्य निर्णय घेण्यात आला नाही, तर येत्या काळात आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

