डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई : 20 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
रेडे भरून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ब्राह्मणी–खडकी शेतशिवारात पकड
सडक अर्जुनी :
डुग्गीपार पोलिसांनी आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता मोठी कारवाई करत 20 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आमगावहून नागपूरच्या दिशेने बेकायदेशीररीत्या रेडे वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पाठलाग करून ब्राह्मणी–खडकी गावाजवळील राजेंद्र शिवणकर यांच्या शेतशिवारात अडवून पकडला.
प्राप्त माहितीनुसार, जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणारा ट्रक आमगावहून नागपूरकडे जात असल्याची गोपनीय माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ सापळा रचून ट्रक क्रमांक CG 08 AU 3035 चा पाठलाग सुरू केला. ट्रक भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना वेळेत माहिती मिळाल्याने शेतशिवारात ट्रक अडवण्यात यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणेदार गणेश वणारे व ए.पी.आय. शेख यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत दीपक खोटले, विजय कोटांगले, जागेश्वर ऊके, महेंद्र चौधरी, मळगामे, मुळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत खालील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे –
मनोज कुमार सोनवाणी, रा. भिलाई, जिल्हा दुर्ग (चालक)
लावली उर्फ जसपाल गुरुदेव सिंग बल, रा. सडक अर्जुनी
एक अनोळखी इसम
आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा 1960, कलम 11(1)(ड) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास व कायदेशीर कारवाई डुग्गीपार पोलीस करीत आहेत.

