मागील तीन वर्षांपासून कोयलारी येथील पोलीस पाटील पद रिक्त — नागरिकांचा सवाल : भरती केव्हा होणार?
सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी
ग्राम कोयलारी येथे मागील तीन वर्षांपासून पोलीस पाटील हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. शासनाकडून अद्यापही या पदावर नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलीस पाटील हे पद गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. गावातील शांतता, तंटे-विवाद, अन्याय, अत्याचार तसेच प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून पोलीस पाटीलची भूमिका महत्त्वाची असते. मात्र हे पद रिक्त असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले, तसेच विधवा, अनाथ, वृद्धापकाळ, अपंग व इतर शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेली वारसाण प्रमाणपत्रे मिळवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कोयलारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रधानटोला, कोहलीटोला व कोयलारी येथील नागरिकांना याचा फटका बसत आहे.
तीन वर्षांचा कालावधी उलटूनही शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने गांभीर्याने लक्ष घालून कोयलारी पोलीस पाटील पदाची भरती करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक जनतेकडून करण्यात येत आहे.

