नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज
सडक अर्जुनी (प्रतिनिधी):
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना मुरदोर्ली परिसरात एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, काही ठिकाणी नियमभंगाच्या आरोपांनाही उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. पडोळे हे दिनांक 4/5/2026 रोजी आपल्या पत्नी व संपूर्ण परिवारासह तसेच सहकाऱ्यांसोबत मुरदोर्ली गेटमार्गे जंगल सफारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सफारीदरम्यान त्यांना वाघांचे दर्शन झाले नाही.
त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीची पाहणी करताना काहीसा उशीर झाला. नर्सरीतील रोपे व उपक्रमांची माहिती घेतल्यानंतर खासदार व त्यांचा परिवार परतीच्या मार्गावर निघाला.
दरम्यान, परत येत असताना महामार्गालगतच्या परिसरात, हायवेपासून अंदाजे 200 मीटर अंतरावर, रस्त्याच्या कडेलाच अचानक एकाच वेळी पाच वाघांचे अद्भुत दर्शन झाले. ही घटना पूर्णपणे अनपेक्षित होती. त्या क्षणी उपस्थितांनी केवळ फोटो व व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले.
मात्र, या घटनेनंतर काही माध्यमांतून नियमभंगाचे आरोप करण्यात आले. यावर संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही प्रकारे जंगल नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. तसेच, सफारीच्या वेळेबाहेर किंवा रात्री कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही.
एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन होणे ही दुर्मीळ व रोमांचक बाब मानली जात असून, या घटनेमुळे परिसरात उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, वस्तुस्थितीची पडताळणी न करता आरोप करण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असून, जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खासदार डॉ प्रशांत पडोळे= मी माझ्या संपूर्ण परिवार व कार्यकर्ते यांच्या सोबत मुरदोली येथील नर्सरी ला भेट दिली. व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत जंगल सफारी केली पण कोणतेही वाण्याप्रणी यांचे दर्शन झाले नाही . माझे सहकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत मी वापस जात अशांनी महामार्गा जवळून 200 किमी अंतरावर आम्हाला 5 वाघांचे दर्शन झाले माझे सहकारी यांनी वापस जात अशांनी झालेल्या 5 वाघांचे अचानक दर्शन यांचा व्हिडिओ फोटो कॅमेऱ्यात घेतला.मी कोणताही नियमभंग केला नाही

