१.४७ कोटींच्या विकास कामांना मंजुरी; पारदर्शक कारभारामुळे सरपंच हर्ष मोदी चर्चेत
गोंदिया | प्रतिनिधी
ग्रामपंचायत सौंदल येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष मासिक सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ₹१ कोटी ४७ लाखांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्यामुळे सरपंच हर्ष मोदी यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात जोरदार सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यात प्रथमच पारदर्शक ओपन टेंडर प्रक्रिया
गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाइन ओपन टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. सरपंच हर्ष मोदी यांच्या नेतृत्वाखाली या प्रक्रियेत पारदर्शकता, स्पर्धात्मकता आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
निविदांची माहिती दैनिक भास्कर, सकाळ आणि देशोन्नती यांसारख्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण गोंदिया जिल्हा तसेच महाराष्ट्रभरातील ठेकेदारांना खुले आमंत्रण देण्यात आले.
या निविदा प्रक्रियेत सुमारे ३३ ते ३५ ठेकेदारांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले असून, निविदा तब्बल ३७ टक्क्यांपर्यंत बिलो गेल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ही बाब अत्यंत उल्लेखनीय आणि ऐतिहासिक मानली जात आहे.
पारदर्शकतेमुळे विकासकामांना वेग
सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हर्ष मोदी यांनी ग्रामपंचायतीत पारदर्शकता निर्माण करण्यासोबतच शासनाच्या विविध योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतला आहे.
ग्रामपंचायतीत बालसभा, वार्डसभा, ग्रामसभा तसेच विशेष ग्रामसभांचे नियमित आयोजन केले जात असून, त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि जबाबदार बनले आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत असून, अनावश्यक विलंबाला आळा बसला आहे.
विरोधाच्या पार्श्वभूमीवरही जनसमर्थन कायम
दरम्यान, काही विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत असले तरी सरपंच हर्ष मोदी यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या काळात सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या वेगवान विकासकामांमुळे काही राजकीय वर्तुळांत अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातूनच विरोधाची भूमिका घेतली जात असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर त्यांना पदावरून दूर करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे; मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
विविध योजनांतर्गत कामांना मंजुरी
मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये १५वा वित्त आयोग, माझी वसुंधरा अभियान, ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांचा समावेश आहे.
याशिवाय यापूर्वी मंजूर झालेल्या सुमारे ₹३ ते ₹३.५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भंडारकर, आमदार राजकुमार बडोले आणि परिणय फुके यांच्या उपस्थितीची शक्यता वर्तविण्यात येत
“काम पहिले” हीच ओळख
सध्या ग्रामपंचायत सौंदलमध्ये सरपंच हर्ष मोदी यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, “काम पहिले” या भूमिकेतून जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ठाम प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

