बदलीनिमित्त नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ सोडगीर यांना गोरेंगावकरांचा भावनिक निरोप
गोंदिया | प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण विभागाचे गोरेंगाव नियत क्षेत्र अधिकारी विश्वनाथ रघुनाथ सोडगीर यांची बदली झाल्याने गोरेंगाव येथे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जनजागृती, शाळांमधील पर्यावरण शिक्षण तसेच विविध शासकीय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला.
यावेळी नागरिक, विद्यार्थी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विभागातील सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विश्वनाथ सोडगीर म्हणाले, “गोरेंगाव हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्व आहे. येथे मिळालेलं प्रेम, आपुलकी आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही. सरकारी सेवेत बदली हा प्रवासाचा भाग असला तरी गोरेंगाव माझ्या हृदयात कायम राहील.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक कार्यशैलीचे कौतुक करत पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यामुळे गोरेंगाव परिसरात पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढली असून अनेक विकासात्मक उपक्रमांना गती मिळाल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
“गोरेंगाव माझ्या कार्यक्षेत्रातून जाईल, पण माझ्या हृदयातून कधीच जाणार नाही,” या भावनिक शब्दांनी सोडगीर यांनी उपस्थितांचा निरोप घेतला.

