शासकीय रुग्णालय सडक अर्जुनीच्या स्लॅबमधून पाण्याची गळती; रुग्णांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
सडक अर्जुनी : तालुक्यातील शासकीय रुग्णालयात पावसाळा सुरू होताच इमारतीच्या स्लॅबमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये छतामधून पाणी ठिबकत असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गळणाऱ्या पाण्यामुळे वॉर्डमध्ये ओलावा निर्माण झाला असून जमिनीवर पाणी साचत आहे. त्यामुळे घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळण्याऐवजी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
याप्रकरणी युवासेनेचे नेते महेशभाऊ डुंभरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “शासनाने शासकीय रुग्णालयाच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष द्यावे. रुग्णांना होत असलेल्या गैरसोयी त्वरित दूर करून गळतीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी. रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे,” असे सांगितले.
स्थानिक नागरिकांनीही संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन स्लॅबची दुरुस्ती करावी व रुग्णांना होत असलेल्या त्रासातून त्वरित दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

