अखेर पोलिस पाटील भरतीची चौकशी थंड बस्त्यात? जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मिळणार का?
गोंदिया (प्रतिनिधी):
वर्ष 2024 मध्ये सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
स्थानिकांच्या मते, जे उमेदवार पात्र होते त्यांना डावलण्यात आले, तर दलालांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना पैसे देणाऱ्यांची निवड करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची चौकशी करून भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी 13 फेब्रुवारी 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मोरगाव अर्जुनी येथे 20 ते 30 उमेदवारांनी भूक हडताल सुरू केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, दोन वर्ष उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने अपात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधितांनी इशारा दिला आहे की, येत्या 15 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य निर्णय झाला नाही, तर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

