सहा महिन्यांतच ‘गायब’ झाला कोसबी बकि मेंढकी रस्ता!
निकुष्ठ कामकाजाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांचा आंदोलनाचा इशारा
सडक अर्जुनी, ता. ०२ जून : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोसंबी–बकी–मेंढकी या मार्गावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या सहा महिन्यांत उखडून पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासीबहुल भागातील नागरिकांना दर्जेदार रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच रस्त्याच्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सिमेंटचे थर निखळून रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामावेळी आवश्यक असलेली गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया पाळण्यात आली नाही. तसेच सिमेंट रस्त्यासाठी आवश्यक असलेले क्युरिंग व्यवस्थित न झाल्याने रस्त्याची मजबुती कमी झाली. यामुळेच रस्ता एवढ्या कमी कालावधीत खराब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, कामाच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याचेही समोर आले आहे. कामाची किंमत, ठेकेदाराचे नाव, मंजूर निधी व संबंधित अधिकाऱ्यांची माहिती नागरिकांना उपलब्ध नसल्याने या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सचिन फुंडे यांनी तीव्र भूमिका घेतली असून प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. “जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या विकासकामांची अशी दुर्दशा सहन केली जाणार नाही. निकृष्ट दर्जाच्या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
सचिन फुंडे यांनी पुढे सांगितले की, शासनाचा निधी खर्च करूनही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत नसतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
सध्या या रस्त्याच्या निकृष्ट कामकाजाची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत. आता संबंधित विभाग या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करतो की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

