ब्राम्हणी–मंदिटोला रस्ता मृत्यूच्या दारात; जनप्रतिनिधी मात्र ‘विकास’ाच्या गप्पांत!
विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, महिला व सर्वसामान्य नागरिकांचे हाल; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे कायम दुर्लक्ष
सडक अर्जुनी : प्रतिनिधी
सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी ते मंदिटोला हा प्रमुख संपर्क मार्ग आज पूर्णपणे खड्डेमय झाला असून या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाण्याने भरत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या रस्त्यावरून दररोज शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, उपचारासाठी दवाखान्यात जाणारे रुग्ण, सडक अर्जुनी तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी जाणारे पालक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासासाठी दुप्पट वेळ लागत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निवडणुकीच्या काळात जनप्रतिनिधी गावोगावी येऊन विकासाची मोठी आश्वासने देतात, हात जोडून मते मागतात. मात्र निवडणूक संपताच गावाकडे आणि जनतेच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. “निवडणुकीत जनता आठवते, निवडणूक संपली की जनतेची गरज संपते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन ब्राम्हणी–मंदिटोला मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

