मुरदोली जंगलात भीषण अपघात; खासदार डॉ. प्रशांत पडोळे ठरले ‘देवदूत’, जखमींचे जीव वाचवले
सडक अर्जुनी | गोरेगाव तालुक्यातील मुरदोली जंगल परिसरात मंगळवारी (दि. 05 मे) सायंकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातानंतर माणुसकीचे दुर्मिळ आणि प्रेरणादायी दर्शन घडले.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अपघाताची माहिती मिळताच कोणताही विलंब न करता तात्काळ आपली गाडी थांबवली आणि जखमींना मदतीचा हात दिला. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना आपल्या वाहनातून गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले.
त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनीही तत्परतेने मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. अपघातात जखमी झालेले पवन शेखर शहारे (वय 30) व पीतांबर भगवान शहारे (वय 34, रा. तावशी, ता. मोरगाव अर्जुनी, जि. गोंदिया) यांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत असून, संकटाच्या क्षणी जनतेसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

