महामार्ग क्र. 53 वरील उड्डाणपूल पुन्हा धोक्यात? पहिल्याच पावसात अॅप्रोच रोडला तडे, रस्ता खचला; निकृष्ट कामाचा आरोप

शिक्षा

महामार्ग क्र. 53 वरील उड्डाणपूल पुन्हा धोक्यात?

पहिल्याच पावसात अॅप्रोच रोडला तडे, रस्ता खचला; निकृष्ट कामाचा आरोप

“NHAI ने COD तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन” – शिवसेना युवासेना माजी जिल्हाप्रमुख महेशभाऊ डुंभरे

सडक अर्जुनी, प्रतिनिधी : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्त्यावर खच पडल्याचे दिसून येत आहे. तसेच रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे 100 मीटर रस्ता तुटला होता. यावर्षीही साधारण पावसात मुख्य रस्ता खचल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शिवसेना युवासेना गोंदिया माजी जिल्हा प्रमुख महेशभाऊ डुंभरे  

याप्रकरणी शिवसेना युवासेना माजी जिल्हाप्रमुख महेशभाऊ डुंभरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. मागील वर्षी पहिल्याच पावसात सुमारे 100 मीटर अॅप्रोच रोड तुटला होता. यावर्षीही साधारण पावसात मुख्य रस्त्यावर खच पडला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे COD तात्काळ थांबवून संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

NHAI प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजित जिजकार

या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे या प्रकरणात NHAI ची अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या उड्डाणपुलावरून दररोज हजारो वाहने धावत असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *