वनविभागाच्या निष्काळजीपणाने घेतला चिमुकलीचा बळी*; विरशी येथे वाघिणीचा रक्तरंजित धुमाकूळ
सलग हल्ल्यांनंतरही कारवाई नाही; ग्रामस्थांमध्ये संताप, वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी
साकोली तालुका प्रतिनिधी:
विरशी येथे आज पहाटे वाघिणीच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ मिरी (मुक्काम सुहेला, जिल्हा बलोदापुर, छत्तीसगड) हे आपल्या कुटुंबासह संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीचे काम करण्यासाठी वास्तव्यास होते. आज पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास वाघिणीने झोपेत असलेल्या त्यांच्या पाच वर्षीय मुलगी अशिंका काशिनाथ मिरी हिला उचलून नेले. या घटनेत बालिकेचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या आधीही परिसरात वाघिणीचे अनेक हल्ले झाले आहेत. बांपेवाडा येथे वसंता मेश्राम यांचा बळी गेला होता. त्यानंतर छाया मुंग यांनाही वाघिणीने ठार केले होते. तसेच उमरजरी येथे एका महिलेला वाघिणीने जखमी केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सलग घटना घडत असतानाही वनविभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांनी कॅमेरे लावून वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप वाघीण जेरबंद न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच निवेदन देत वाघिणीला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली असून संबंधित विभागाच्या गेटवर आंदोलनही करण्यात आले आहे.
वारंवार हल्ले होत असूनही वनविभागाने योग्य ती खबरदारी घेतली नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे विरशी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

