डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, समता व न्यायाचे अखंड दीप:– इंजि. आनंद चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि मानवतेचे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान, समता आणि न्यायाचे अखंड दीप आहेत, असे प्रतिपादन इंजि. आनंद चंद्रिकापुरे (तालुका सचिव, भारतीय जनता पार्टी, गोरेगाव) यांनी केले.
डव्वा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक 13 एप्रिल 2026 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले, प्रामुख्याने चेतन वडगाये सभापती, आनंद चंद्रिकापुरे तालुका सचिव भाजपा गोरेगाव, शैलेश नंदेश्वर जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, शालिंदर कापगते माजी उपसभापती, पुष्पमाला बडोले क्विंनल मुनेश्वर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आनंद चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर समाजातील अन्याय, विषमता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला. त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला, जो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळाला आणि देशाला समानतेच्या मार्गावर नेण्याचे कार्य झाले.
इंजि. चंद्रिकापुरे यांनी युवकांना आवाहन केले की, बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा अंगीकार करावा. समाजातील भेदभाव दूर करून सर्वांना समान संधी देणे हेच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.

