कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा

करियर करोबार महाराष्ट्र राजनीति शिक्षा स्वास्थ्य

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा

सडक अर्जुनी (प्रतिनिधी) :

मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील कोहमारा येथे रखडलेला उड्डाणपूल अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मंजूर झाला असून येत्या 2 ते 3 महिन्यांत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र प्रस्तावित उड्डाणपूल “आरीवाल” पद्धतीचा असल्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

ग्रामस्थांच्या मते, आरीवाल उड्डाणपूल झाल्यास गाव दोन भागांत विभागला जाईल व स्थानिक वाहतुकीला अडचणी निर्माण होतील. त्यामुळे कोहमारा येथे “कॉलम” पद्धतीचा उड्डाणपूल उभारावा, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.

सरपंच प्रतिभा देविदास भेंडारकर यांनी सांगितले की, “आमच्या गावाची रचना लक्षात घेता आरीवाल उड्डाणपूल योग्य नाही. त्यामुळे गावाचे विभाजन होण्याची शक्यता आहे. आम्ही कॉलम उड्डाणपुलासाठी NHAI कडे ग्रामपंचायतीचा ठराव व निवेदन सादर करणार आहोत.”

दरम्यान, माजी युवासेना गोंदिया जिल्हा उपप्रमुख महेशभाऊ डुंभरे यांनीही कॉलम उड्डाणपुलाची मागणी लावून धरली आहे. “कोहमारा येथे कॉलम उड्डाणपूलच व्हावा. अन्यथा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

एकूणच, कोहमारा येथील उड्डाणपुलाच्या डिझाइनवरून स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाला असून, NHAI याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *