ब्राह्मणी खडकी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
बस स्टॉप परिसरातून उभ्या जेसीबी व हेडरा मशीनच्या बॅटऱ्या चोरी; शेतातील मोटार पंपाची 70 फूट सर्व्हिस वायरही लंपास
ब्राह्मणी खडकी (ता. सडक अर्जुनी): ब्राह्मणी खडकी परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत जेसीबी व हेडरा मशीनच्या बॅटऱ्या तसेच शेतातील मोटार पंपाची सुमारे 70 फूट सर्व्हिस वायर चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या सलग चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणी खडकी येथील बस स्टॉपजवळ हार्डवेअर दुकानासमोर उभी असलेल्या कृष्ण ठलाल यांच्या जेसीबी मशीनमधील अंदाजे ₹15 हजार किमतीची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
याच परिसरात उभी असलेल्या देवानंद तागडे यांच्या हेडरा (क्रेन) मशीनमधील अंदाजे ₹15 हजार किमतीची बॅटरी देखील चोरट्यांनी लंपास केली.
तसेच, बामणी येथील राजू बरेकार यांच्या मंदिटोला रोडलगतच्या शेतातील सुरू असलेल्या मोटार पंपाची सुमारे 70 फूट सर्व्हिस वायर, अंदाजे ₹10 हजार किमतीची, अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली.
परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, तसेच पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

