स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात २२ ते २७ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन – आमदार इंजि. राजकुमार बडोले यांची पत्रकार परिषदेत माहिती
सडक अर्जुनी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघात आमदार इंजि. राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने दि. २२ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसेवा सप्ताहाची सविस्तर माहिती आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील आपल्या निवासस्थानी दिली.
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सप्ताहात वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, फळवाटप, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, कृषी सन्मान पुरस्कार वितरण तसेच महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास व लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जनसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार बडोले यांनी सांगितले.
दि. २२ जुलै २०२६ रोजी कोलारगाव/कोसबी येथे सकाळी १० वाजता वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी ११ वाजता तेजस्विनी लॉन, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे रक्तदान शिबिर होणार आहे. २३ जुलै २०२६ रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय, अर्जुनी-मोर येथे सकाळी ११ वाजता फळवाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. २४ जुलै २०२६ रोजी युवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तहसील कार्यालय व उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी परिसरात सकाळी १० वाजता हा उपक्रम होणार आहे. २५ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महागाव येथे सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर तसेच स्व. अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार व स्व. अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण समारंभ आशिर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. २६ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरी येथे सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २७ जुलै २०२६ रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दुर्गा चौक, शेंडा रोड, सडक अर्जुनी येथे सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, रक्तदाते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केले आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, महिला तालुकाध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे तसेच युवक शहराध्यक्ष आकाश गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्व. अजितदादा पवार यांच्या लोकसेवेच्या विचारांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जनतेच्या सेवेत प्रत्यक्ष सहभागी होणे. त्याच उद्देशाने या जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, हा सप्ताह समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त ठरेल असे आमदार राजकुमार बडोलेनी पत्रकार परिषदेत सांगितले.

