कोहमारा येथे अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई : गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, दुकान संचालक अटकेत
सडक अर्जुनी :
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येणाऱ्या कोहमारा येथे अन्न सुरक्षा विभागाने प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दुकान संचालकाला अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य जनार्धन नानोटे यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 214, 323, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 च्या कलम 262 (i), 262 (iv), 273 (d), 273 (e) आणि 59 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोहमारा परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याच्या सतत तक्रारी अन्न सुरक्षा विभागाला प्राप्त होत होत्या. याच पार्श्वभूमीवर विभागाच्या पथकाने सुमीत किराणा दुकानावर छापा टाकला. दुकानाची तपासणी केली असता विमल पान मसाला, पान पराग, इगल गुटखा तसेच सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. हा सर्व माल तात्काळ जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान सुमारे 9 हजार 30 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीवर पूर्णपणे बंदी असताना देखील खुलेआम विक्री होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दुकान संचालक विलास भेंडारकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या त्यांना भंडारा कारागृहात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी देऊरकर करत आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य नानोटे यांनी सांगितले की, प्रतिबंधित खाद्य पदार्थांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तर डुग्गीपार पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश वणारे यांनी नागरिकांना आवाहन केले की, कुठेही गुटखा किंवा सुगंधित तंबाखूची अवैध विक्री होत असल्यास तात्काळ माहिती द्यावी.
या कारवाईनंतर परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

