शेतातच शेतीचे धडे; जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणी खडकी अनोखा उपक्रम
ब्राह्मनि खडकी, दि. २५ जुलै – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राह्मण खडकी येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतीविषयक ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शेतीमधील पेरा कसा करावा, पिकांची लागवड कशी केली जाते, शेतीचे नियोजन, मातीची मशागत तसेच आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींची सविस्तर माहिती प्रत्यक्ष शेतामध्ये देण्यात आली.
या उपक्रमासाठी विलास वट्टी, विकास खोटेले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लेखचंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरे यांच्या शेतात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शेतीतील विविध कामे जवळून पाहून शेतीविषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्यांची समाधानकारक उत्तरेही मिळाली.
या उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी शिक्षक अरुण शिवणकर यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शेतीचे महत्त्व समजले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आवड निर्माण करून कृषीविषयक ज्ञान वाढविणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

