महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण संस्था व महाराष्ट्र पत्रकार संघाचे निवेदन
सडक अर्जुनी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण बहुउद्देशीय संस्था व महाराष्ट्र पत्रकार संघ, सडक अर्जुनी यांच्या वतीने दुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
दि. १४ मे रोजी विविध आंबेडकरी संघटना व बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन देऊ नये, अशी आग्रही मागणी केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
बनावट फेसबुक आयडीद्वारे आक्षेपार्ह पोस्ट
मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथील रहिवासी गौरेश बावनकर याने ‘दिनेश ब्राम्हणकर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील आक्षेपार्ह व द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित केला. तसेच महापुरुषांच्या छायाचित्रांचे विद्रूपीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आरोप
निवेदनात नमूद केल्यानुसार, आरोपीने जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी समाज व बौद्ध बांधवांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून परिसरात असंतोष निर्माण झाला आहे. डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
मुख्य मागण्या
आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मंजूर करू नये
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ हटविण्यात याव्यात
विविध संघटनांची उपस्थिती
निवेदन देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कल्याण बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र पत्रकार संघ सडक अर्जुनी तसेच तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये संस्थेचे अध्यक्ष भाऊदास जांभुळकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष चंद्रमुनी बनसोड, सहसचिव कमलकुमार चव्हाण, गजानन गजभिये, सुभाष बडोले, तुलसीदास राऊत, सुभाष कोटांगले, महेश राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

