समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला सक्षमीकरण, सुशासन व ‘लखपती दीदी’ अभियानावर सविस्तर मार्गदर्शन
शेंडा | प्रतिनिधी : दि. 27 जुलै 2026 (सोमवार) रोजी समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी लताताई उरकुडे या होत्या. वेदवतीताई उके (सचिव) व लक्ष्मीताई उके (कोषाध्यक्ष) यांनी सभेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
सभेला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा. अतुल मुटकुरे सर तसेच ता. अ. व्य. सुहास परशुरामकर सर (IBCB) उपस्थित होते. त्यांनी महिला सक्षमीकरण, प्रभागसंघाची सुशासन व्यवस्था, आर्थिक पारदर्शकता, नियमित सभा, अभिलेखांचे योग्य व्यवस्थापन, विविध उपजीविका उपक्रम, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक लिभाष घरडे (प्रभाग समन्वयक) यांनी केले.
सभेत मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा व मंजुरी, आर्थिक अहवाल व लेखापरीक्षण, वार्षिक अंदाजपत्रक मंजुरी, ग्रामसंघ व स्वयं-सहाय्यता समूहांच्या प्रगतीचा आढावा, ‘लखपती दीदी’ अभियानाची सद्यस्थिती, अभिलेख अद्ययावत ठेवणे, कॅडर व लेखापालांच्या जबाबदाऱ्या, आगामी वर्षाचा कृती आराखडा तसेच उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर चर्चा करून विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेला 18 ग्रामसंघांचे पदाधिकारी, स्वयं-सहाय्यता समूहातील सदस्य, प्रभाग कृषी व्यवस्थापक तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संघटनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

