अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा! महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्षा

अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा!

महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अर्जुनी मोरगाव : अवैध दारूविक्रीविरोधात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश टटके यांनी धडक कारवाई करत महागाव येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश टटके यांनी पोलीस पथकासह मौजा महागाव येथे छापा टाकला. यावेळी किशोरसिंह शिवकुमारसिंह पवार (वय ४०) याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या ५०० बाटल्या आढळून आल्या.

तसेच परसराम लक्ष्मण जहागीरदार (वय ४०, रा. महागाव) याच्या घराची तपासणी केली असता छपरातील प्लास्टिक पिशवीमध्ये ९० मिलीच्या १६० देशी दारूच्या बाटल्या, तसेच १८० मिलीच्या मॅकडॉवेल्स नंबर वन विदेशी दारूच्या १२ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी एकूण २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी रोशन बंजारा यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) व ७७(अ) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरव भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *