सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट!
आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यानंतर NHAI जागे होणार? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का?
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड उड्डाणपुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली असून, उड्डाणपुलाजवळ तयार करण्यात आलेला ब्रेकर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचालकांसह वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात दोन ते तीन जणांचा जीव गेल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून, या अपघातांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
१४ ऑक्टोबरला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
१४ ऑक्टोबर रोजी सोलापूरहून चिक्कूची गाडी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH 04 GC 9436 सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर परिसरात भीषण अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक नागनाथ कराडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर अनिकेत उदावडे यांचा पाय तुटल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संबंधित ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ब्रेकरवर वेग कमी करताच मागून धडक
याच ठिकाणी कार क्रमांक MH 10 DG 2081 च्या चालक भास्करराव अण्णा यांनी ब्रेकरमुळे वाहनाचा वेग कमी केला असता, मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले. ब्रेकरमुळे अचानक वेग कमी करावा लागत असल्याने मागून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
२४ ऑक्टोबरला पुन्हा दोन अवजड वाहनांची धडक
आज, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने ब्रेकरजवळ वेग कमी केला. यावेळी एका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या MH 40 AK 4084 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की ट्रेलर आणि ट्रक दोन्ही पलटी झाले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
NHAI संबंधित कंपनीवर कारवाई करणार का?
एकाच ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकरच्या रचनेबाबत आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्रेकरवर योग्य दिशादर्शक फलक, रात्री स्पष्ट दिसणारे रिफ्लेक्टर, पुरेशी पूर्वसूचना आणि आवश्यक सुरक्षा उपाय आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, आणखी किती अपघात झाल्यानंतर संबंधित यंत्रणा जागी होणार? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या ठिकाणाची तातडीने पाहणी करून ब्रेकरची सुरक्षितता तपासणार का? नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई होणार का? तसेच हा ब्रेकर सुरक्षित पद्धतीने दुरुस्त केला जाणार की हटविण्यात येणार?
या गंभीर प्रश्नांकडे NHAI आणि संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, सौंदड उड्डाणपुलाजवळील हा ब्रेकर वाहनचालकांसाठी धोक्याचे ठिकाण बनून राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिक, ट्रकचालक आणि वाहनमालकांचे लक्ष लागले आहे.

