ब्राम्हणी खडकीत भीमज्योत कार्यक्रम उत्साहात संपन्न!
भीम रॅलीत ‘जय भीम’च्या जयघोषाने गाव दुमदुमले; उपासक-उपासिका व गावकऱ्यांचा जनसागर
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
ब्राम्हणी खडकी : गावातील सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मीय सलोख्याची परंपरा जपत ब्राम्हणी खडकी येथील सारीपुत्त बौद्ध विहार, वॉर्ड क्रमांक ३ येथे तीन दिवसीय भीमज्योत कार्यक्रम उत्साहात पार पडला. १९, २० आणि २१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या कार्यक्रमात उपासक-उपासिका, महिला, युवक आणि गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. २१ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या भव्य भीम रॅलीत ‘जय भीम, जय भीम’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण ब्राम्हणी खडकी गाव दुमदुमून गेले.
गावातील प्रत्येक समाजबांधवांच्या एकजुटीतून सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्याची परंपरा ब्राम्हणी खडकी गावाने जपली आहे. याच सामाजिक ऐक्याचे दर्शन भीमज्योत कार्यक्रमाच्या निमित्ताने घडून आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता बौद्ध वंदना आणि ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून सामाजिक एकोपा, बंधुता आणि महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या ध्वजारोहणप्रसंगी ललित डोंगरवार, सरपंच विलास वाटी, उपसरपंच विकास खोटेले, डॉ. डी. एम. सुरसाऊत, डॉ. प्रणय चुटे, डॉ. अविनाश दोनोडे, सुखदेव सर, रमेश इडपाते, चंदू बहेकार आणि सुग्रेश तागडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
भीम रॅलीत जय भीमचा जयघोष
२१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भव्य भीम रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपासक-उपासिका, युवक, महिला आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘जय भीम, जय जय भीम’च्या घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक समता, बंधुता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. भीमज्योत विसर्जनानंतर संपूर्ण गावासाठी भोजनदान करण्यात आले. या भोजनदानातून सामाजिक एकात्मता आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महिला व कार्यकर्त्यांचे योगदान
या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष वामन गजभिये, भीमराव रामटेके, हिरा गजभिये, प्रदीप मेश्राम, लीलाराम कांबडे, सिद्धार्थ बोरकर, राजीव मेश्राम, योगेश्वर वैद्य, अनुप मेश्राम यांच्यासह शारदा गजभिये, वंदना बोरकर, दीपाली रामटेके, सुषमा मेश्राम, जोसना कांबळे, पिंकी मेश्राम, पुष्पा गजभिये, रेखा गजभिये आणि विश्वलता मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन राजेश मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष बोरकर सर यांनी मानले.
ब्राम्हणी खडकी येथील या भीमज्योत कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि सामूहिक सहभागाचा आदर्श निर्माण झाला. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तीन दिवसीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

