शशिकरण मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय सांगता! योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे कन्यापूजन, गोपालकाला व महाप्रसाद वितरण
सडक अर्जुनी | प्रतिनिधी
सडक अर्जुनी तालुक्यातील मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील जागृत शशिकरण देवस्थान, देवपायली येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अखंड ज्योतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यानिमित्त हरिभक्त भजनी मंडळाच्या वतीने गोपालकाला, कन्यापूजन, कन्याभोजन आणि महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय रॉय उपस्थित होते. योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश भाऊ डुंभरे, सचिव देविदास कोवे आणि कोषाध्यक्ष सुखदेवसिंह ठाकूर यांच्यासह सुरेश बोरकर, मंगेश तवाडे, राकेश नंदागवडी, गिरीपाल फुले, रमेश इडपाते, चंद्रकुमार बहेकार आणि डी. एच. पटणे उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश डुंभरे यांच्या हस्ते विधिवत कन्यापूजन करण्यात आले. कन्यांचा सन्मान करून त्यांना भोजन देण्यात आले. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गोपालकाल्याच्या कार्यक्रमामुळे देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
धार्मिक श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमात ट्रस्टचे पदाधिकारी, हरिभक्त भजनी मंडळाचे सदस्य आणि भाविकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संबंधित पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

